रानावनात पळस पेटायला लागले की वसंताची चाहूल लागते. यातच येते होळी. विदर्भात, खान्देशात, कोकणात, आदिवासी भागात होळीची मज्जा वेगवेगळी असते. पण या सर्वांमध्ये हमखास असते ती पुरणाची पोळी. आदिवासी भागात या पुरणपोळीच्या जोडीला असतो बोहाडा! या बोहाड्याच्या सोंगानं खऱ्या अर्थानं शिमग्याला साज चढतो... आणि आदिवासी संबळ, डफाच्या तालावर बेधुंदपणं नाचत राहतो, नाचत राहतो.