मशहुरुल हजरत राजश्री जिवाजी विनायक सुभेदार व कारकून सुभे मामले प्रभावळी प्रती राजश्री शिवाजी राजे दंडवत. सुहुरसन खमस सबैर व अलफ. दौलतखान व दरिया सारंग यांसी ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत पेशवे यांणी वराता सुभे मजकुरावरी दिधल्या. त्यांस तुम्ही काही पावविले नाही म्हणोन कळो आले. त्यावरून अजब वाटले की ऐसे नादान थोडे असतील! तुम्हास समजले असेल की याला ऐवज कोठेतरी देवविला पाहिजे. तो न पावविता ऐवज खजाना रसद पाठीविलीया माजरा होईल म्हणत असाल. तरी पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी केली आहे. त्याची मदत व्हावी. पाणी फाटी आदि करून सामान पावावे. या कामास आरमार बेगीने पावावे. ते होत नाही तर पद्मदुर्ग हबशी फौजा चौफेर जेर करीत असतील. आणि तुम्ही ऐवज न पाठवून आरमार खोळंबून पाडाल. एवढी हरामखोरी तुम्ही कराल आणि रसद पाठवून मजरा करू म्हणाल. त्यावरी साहेब रीझतील की काय? ही गोष्ट घडायची तरी होय, न काळे की हबशियांनी काही देऊन आपले चाकर तुम्हास केले असतील! त्याकरिता ऐसी बुद्धी केली असेल! तरी ऐश्या चाकरास ठिकेठिक केली पाहिजेत. ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो? या उपरी त्याला ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत देविला असे तो देवितील. तो खजाना रसद पाविलीयाहून अधिक तेणेप्रमाणे आदा करणे की जे तुमची फिर्याद न करीत व त्यांचे पोटास पावून आरमार घेऊन पद्मदुर्गाच्या मदतीस राहात ते करणे. या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल. ताकीद असे.
रवाना छ २ जिल्काद.
Join this channel to support me:
/ @marathihistorychannel
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi